सीसीटीएनएसच्या रँकींगमध्ये राज्यात पहिल्या क्रमांकावर
नवी मुंबई : पोलीस दलाचे कामकाज ऑनलाइन करण्याकरिता राबविण्यात येणारा सीसीटीएनएसच्या प्रकल्प कामकाजामध्ये महाराष्ट्राच्या ऑक्टो-२३ च्या आढाव्यात नवी मुंबई आयुक्तालयाचा प्रथम क्रमांक आल्याने पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे व अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दिपक साकोरे यांनी सीसीटीएनएसचे कामकाज करणाऱ्या नवी मुंबई पोलीस दलातील सर्व अधिकारी व पोलीस ठाण्यातील महिला अंमलदारांचा प्रशस्तीपत्रक देवून सत्कार केला आहे. डिसेंबर २०२२ मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालय ३६ व्या क्रमांकावर होते.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पोलीस आयुक्त मिलिद भारंबे यांनी नवी मुंबई पोलीस दलाला शिस्त लावण्याबरोबरच पोलीस दलाचे सर्व कामकाज ऑनलाईन करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी त्यांनी सीसीटीएनएस कार्यप्रणालीतील कामकाजात सुधारणा करून सर्व कामकाज ऑनलाईन करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने पोलीस दलाचे कामकाज ऑनलाईन करण्याकरिता राबविण्यात येणाऱ्या सीसीटीएनएस यंत्रणेत एफआयआर नोंदणी पासून ते अन्वेषण आणि आणि चार्जशीट व त्यासंबधीत सर्व कामकाज ऑनलाईन पद्धतीने हाताळण्यास सुरुवात केली आहे.
राज्यातील संपूर्ण पोलीस यंत्रणेचे कामकाज ऑनलाईन करण्यात आल्याने राज्यातील प्रत्येक पोलीस दलाला सीसीटीएनएस कार्यप्रणालीतील १ ते २१ फॉर्ममध्ये माहिती भरावी लागत आहे. यात एफआयआर, घटनास्थळ पंचनामा, अटक आरोपी, मालमत्ता जफ्त, चार्जशीट, शिक्षा आणि अपिल व इतर माहितीचा समावेश आहे. नवी मुंबई पोलीस दलाने यातील महत्वाचे ७ फॉर्म १०० टक्के भरण्याबरोबरच सीसीटीएनएस प्रणाली अंतर्गत असलेल्या सीआरआय, एमएसी पोर्टल, आसीजेसी पोर्टल, आयटीएसएसओ पोर्टल या महत्वाच्या पोर्टलचा सुद्धा सुयोग्य पद्धतीने वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पोलीस दलाच्या कामकाजात सुसूत्रता आल्याने वाहन चोरी संबधित गुन्हे, आरोपींचा पूर्व इतिहास, महिला व बालकांसंबधित असलेले गुन्हे हाताळण्यास सुलभ होऊन त्याचा विविध गुन्ह्यांच्या तपासात व त्यासंबधित गुन्हे निकाली काढण्यास मदत होत आहे.
दरम्यान, पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दिपक साकोरे, पोलिस उपायुक्त (गुन्हे) अमित काळे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन राठोड यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार सीसीटीएनएस कक्षाच्या प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सुवर्णा राऊत व त्यांच्या टीमने चांगली कामगिरी केल्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय सीसीटीएनएस कामकाजात प्रथक क्रमांक मिळवण्यात यशस्वी झाले आहे. त्यामुळे या संपूर्ण टीमचे पोलीस दलातून अभिनंदन करण्यात येत आहे.