डोंबिवलीतही थेट शेतकरी ते ग्राहक संकल्पनेतून भाजी,फळे, कडधान्य उपलब्ध

Maharashtra WebNews
0


 डोंबिवली ( शंकर जाधव ) :  शेतात पिकवलेला शेतमाल कोणत्याही दलालाच्या मध्यस्थीशिवाय स्वस्त दरामध्ये थेट ग्राहकापर्यंत पोहचावा आणि शेतकऱ्यांना त्यातून जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बाजारपेठेचा शुभारंभ सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला. याच विचाराने शहरात कृषी विभाग आत्मा आणि कृषी पणन पुरस्कृत आणि डोंबिवलीकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने थेट शेतकरी ते ग्राहक अशी ती संकल्पना आहे.

 नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने ६ ते १२ ऑक्टोबर दरम्यान दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत डोंबिवली पूर्व येथील नेहरू मैदानात या वेळेत ही ग्राहक पेठ सुरु राहणार आहे. तसेच त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक रविवारी ही ग्राहक पेठ डोंबिवलीतील वेगवेगळ्या महापालिका मैदानांवर आयोजित केली जाणार आहे. सर्वांचे पोट भरावे यासाठी दिवसरात्र शेतात राबणाऱ्या आपल्या अन्नदात्या शेतकरी बांधवांना दोन पैसे जास्त मिळाले, तसेच शहरातील नागरिकांना थेट शेतातील माल खरेदी करता आला तर त्यात दोघांचाही फायदा असल्याचे मत शेतकर्यांनी व्यक्त केले. 

या संकल्पनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या बाजारपेठेत डोंबिवलीकरांना सेंद्रिय तसेच नैसर्गिक पद्धतीचा सर्व प्रकारचा भाजीपाला, फळे, धान्य, कडधान्य आदी जिन्नस रास्त दरात विकत घेता येणार आहेत. नेहरू मैदान येथे नवरात्रीनिमित्त विशेष फ्रुट महोत्सवाच्या रूपाने ही संकल्पना प्रत्यक्षात उतरण्यास सुरुवात झाल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. त्यावेळी ठाणे जिल्ह्यासह परिसरातील शेतकरी, माजी नगरसेवक राहुल दामले, खुशबू चौधरी, संदीप पुराणिक, शशिकांत कांबळे, दत्ता माळेकर, दिनेश दुबे यांसह नागरिक उपस्थित होते.




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)