मृत्युमुखीच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत
नौदल तसेच स्पीड बोट चालक आणि जबाबदार इतरांविरोधात गुन्हा दाखल
मुंबई: गेट वे हून एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल या प्रवासी बोटीला नौदलाच्या एका स्पीड बोटीने धडक दिली. या धडकेत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ७ पुरुष, ४ महिला तर २ बालकांचा समावेश आहे. याप्रकरणी नौदला विरोधात तसेच स्पीड बोट चालक आणि जबाबदार इतरांविरोधात नथाराम चौधरी (२२) याने कुलाबा पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवली आहे. बोट दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्यात येणार आहे.
नौदलाने या अपघाताबाबत एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, बुधवारी दुपारी भारतीय नौदलाच्या जहाजाचे इंजिन निकामी झाल्याने मुंबई हार्बरमध्ये इंजिन चाचणीदरम्यान बोटीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बोट प्रवासी फेरीला धडकली आणि ती उलटली. त्यानंतरच्या शोध मोहिमेत वाचलेल्यांना वाचवण्यासाठी ४ नौदल हेलिकॉप्टर, ११ नौदल जहाजे, एक तटरक्षक नौका आणि तीन सागरी पोलीस जहाजांसह शोध आणि बचाव कार्य सुरू होते.
भारतीय नौदलाच्या एका अधिकाऱ्याने याप्रकरणी सांगितले की, ज्या भागात बोट दुर्घटना घडली त्या भागात शोध मोहिमेत भारतीय नौदलाची ८ जहाजे तैनात करण्यात आली आहेत. त्यांनी सांगितले की, या दुर्घटनेत नौदलाच्या सहापैकी तीन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी आहे. या फेरीत २० मुलांसह सुमारे ११० प्रवासी होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोट दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेची सखोल चौकशी केली जाईल असेही ते म्हणाले. नौदलाबरोबरच पोलीसही या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.