धरणगाव : जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे मंगळवारी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कुटुंबीयाला घेऊन जाणाऱ्या एका गाडीच्या वाहनचालकाने हॉर्न वाजविल्याच्या रागात शिवसैनिक कार्यकर्ते आणि स्थानिक तरुण यांच्यात वाद झाला. मात्र या वादाचे रूपांतर पुढे दंगलीत झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची आणि दुकानांची जाळपोळ करण्यात आली. या प्रसंगामुळे पाळधीमध्ये १६३ चा आदेश लागू करत संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
३१ डिसेंबरच्या रात्री जळगावातील पाळधी गावातून मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी कुटुंबीयाला घेऊन एक गाडी चालली होती. यावेळी या गाडीच्या वाहनचालकाने हॉर्न वाजवला. याचा राग आल्याने गावातील काही तरुणांनी चालकास शिवीगाळ केल्याची माहिती समोर आली आहे. वाहनात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी असल्याने शिवीगाळ करणाऱ्या तरुणांवर काही शिवसैनिक धावून गेले. यानंतर दोन गट आमने सामने आली आणि त्यातूनच ही दगडफेक व जाळपोळीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत भाजीपाला बाजाराच्या जवळील मुख्य रस्त्यावरील तीन ते चार दुकानांना आग लावली. पाळधी व धरणगावच्या पोलिसांसह दंगल नियंत्रक पथकाने पाळधी येथील जमावाला पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच अग्निशामक दलाच्या बंबांनी दुकानांना लावलेली आग नियंत्रणात आणली. काही भागांमध्ये जाळपोळ करण्यात आल्याने पाळधी व लगतच्या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणात काही जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू केली आहे. तर याबाबत रात्री उशीरापर्यंत पाळधी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाळधी गावात सध्या वातावरण हे पूर्णपणे नियंत्रणात आले. कुणीही समाजमाध्यमांवर या संदर्भात अफवा पसरवू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
एरंडोल उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करून पाळधी या संपूर्ण गावाच्या हद्दीत दि. १ ते २ जानेवारीच्या सकाळी ६.०० पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्ती / संस्था / संघटना यांच्या विरुध्द प्रचलित कायद्यात नमूद केल्यानुसार कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे. हा आदेश अत्यावश्यक सेवा उदा. रूग्णसेवा, पाणीपुरवठा, सार्वजनिक वितरण व्यवस्था. अंत्यविधी व शासकीय कर्मचारी यांना लागू राहणार नाही. असे निवृत्ती गायकवाड यांनी दिलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.