मांडवा जेट्टीवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी

 



  • जेट्टीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मांडवा पोलीस तैनात
  • महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त बोटींची व्यवस्थ


अलिबाग (धनंजय कवठेकर) :  मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाच्या स्वागतासाठी नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबई, ठाणे, नवी मुंबई व उर्वरित महाराष्ट्र राज्यासह देशविदेशातील पर्यटक लाखोंच्या संख्येने गेटवे मुंबई ते मांडवा या जलमार्गाने अलिबाग, मुरूड, श्रीवर्धनमध्ये दाखल झाले होते. नववर्षाला निरोप दिल्यानंतर परतीला निघालेल्या पर्यटकांनी मांडवा जेट्टीवर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, यावेळी पर्यटकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी मांडवा सागरी पोलीस व महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे विशेष काळजी घेण्यात येत असल्याचे सांगितले आहे.         


     सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशविदेशातील पर्यटक रायगड जिल्ह्यातील विशेषतः समुद्रकिनारी भागात मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते. यामुळे अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन अश्या सर्वच पर्यटनस्थळी असणारे हॉटेल, लॉज, कॉटेजेस फुल झाले आहेत. मोठ्या संख्येने आलेल्या पर्यटकांमुळे रोजगारासह मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्याने सर्व प्रकारचे व्यावसायिक आनंदात दिसत होते.




    नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यात आलेल्या पर्यटकांनी वेळेची बचत व आरामदायी प्रवासासाठी गेटवे मुंबई ते मांडवा अलिबाग या जलमार्गाला अधिक पसंती दिली आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला आलेल्या पर्यटकांनी परत जातांना बुधवार दि. १ जानेवारी २०२५ रोजी मांडवा जेट्टीवर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी केली असल्याचे दिसून आले. या गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच प्रवाशांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये व प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मांडवा सागरी पोलीसांनी महिला व पुरुष कर्मचारी यांचा विशेष बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच महाराष्ट्र सागरी मंडळाने प्रवाशांची लक्षणीय गर्दी पाहता अतिरिक्त बोटींची व्यवस्था करण्यात आली असल्याचे व प्रवाशांची सुरक्षा व्यवस्थेसंबंधी सर्व प्रकारची काळजी घेण्यात येत असल्याचे महाराष्ट्र सागरी मंडळाचे मांडवा येथील अधिकारी आशिष मानकर यांनी सांगितले.




Post a Comment

Previous Post Next Post