मुस्लिमांना आठ हजारात स्टॉल दिल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या रोहिदास मुंडेंचा शिंदे गटाला टोला
दिवा, (आरती परब) : शिंदे गटाच्या शहर प्रमुखामार्फत दिवा शहरात दिवा महोत्सव सुरू असून येथे मुस्लिमांना आठ हजारात व्यावसायिक स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. परिणामी हिंदुत्वावरून उद्धव साहेबांवर टीका करणाऱ्या शिंदे गटाने आठ हजार रुपयात हिंदुत्व विकलं का? असा सणसणीत टोला शिवसेना ठाकरे गटाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी लगावला आहे.
शिंदे गटाच्या भूमिकेवर आक्षेप घेताना रोहिदास मुंडे यांनी शिंदे गटाच्या दिवा शहर प्रमुखाच्या कृतीवर बोट ठेवले आहे. एकीकडे उद्धव साहेबांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर घेरणारे शिंदे गट स्वतः मात्र दिवा महोत्सव मध्ये पैशांसाठी मुस्लिम व्यवसायिकांना संधी उपलब्ध करून देतात. यांनी केलं तर ते चालतं मात्र उद्धव साहेबांनी माणूसकीच्या दृष्टिकोनातून सर्व धर्मांना समान वागणूक दिली तर मात्र ते उद्धव साहेबांवर हिंदुत्व सोडल्याचा आरोप करतात. दुतोंडी भूमिका असणाऱ्या शिंदे गटाचा बुरखा दिवा महोत्सव मधील व्यावसायिक गाळे मुस्लिम व्यक्तींना आठ हजारात दिल्याने फाटला गेला असल्याचे रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे.
मागील १६ वर्ष दिवा शहराची ओळख झालेल्या दिवा महोत्सवाला वर्षागणिक मिळणारा वाढता प्रतिसाद बघता विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठला आहे. उबाठा पक्षाने विधानसभेला सपाटून मार खाल्ला आहे. अशातच या वर्षी सुरू असलेल्या दिवा महोत्सवात कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत उबाठाच्या विभागप्रमुखांसहित शाखाप्रमुख व महिला आघाडी अशा २०० पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे उबाठा पक्षाला प्रचंड नैराश्य आले आहे. त्यामुळेच ते अशा पद्धतीने वक्तव्य करत आहेत असे ॲड आदेश भगत यांनी म्हटले आहे.- ॲड आदेश भगत, शिवसेना उपशहरप्रमुख