मंत्री अदिती तटकरे यांचे महिला आर्थिक विकास महामंडळाला (माविम) निर्देश
नवतेजस्विनी प्रकल्पाच्या आढावा बैठकीत कोल्हापुरी चप्पल उद्योगाला आधुनिक करण्यासाठी सूचना
कोल्हापूर \ शेखर धोंगडे : कोल्हापुरी चप्पलला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक आकर्षक, आरामदायी आणि आधुनिक बनवण्यासाठी अत्याधुनिक मशिनरी व तंत्रज्ञानाची गरज आहे. यासाठी अतिरिक्त ८६ लाख रुपयांचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाला (माविम) दिले आहेत. कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृहात माविम, महिला उद्योजिका आणि बचत गटांसोबत झालेल्या एका बैठकीत त्या बोलत होत्या.
प्रशासनामार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील सांगरूळ येथे कोल्हापुरी चप्पल बनवण्याचे युनिट सुरू करण्यात येत आहे. या प्रकल्पात १० गावांमधील १५० महिला सहभागी आहेत. या प्रकल्पाची एकूण किंमत १ कोटी २९ लाख रुपये असून, जिल्हा वार्षिक योजनेतून पहिल्या टप्प्यात ४० लाख रुपये देण्यात आले आहेत. प्रकल्पासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ८० लाख, माविमकडून ३० लाख आणि सीएमआरसी (अस्मिता लोकसंचालित साधन केंद्र) स्वतः १९ लाख रुपयांची गुंतवणूक करणार आहे. आतापर्यंत ३८ लाख रुपयांची मशिनरी खरेदी झाली असून इतर कामे सुरू आहेत.
तथापि, कोल्हापुरी चप्पलला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढवण्यासाठी, तिला अधिक आरामदायी बनवणे आणि तिचे ब्रँडिंग व डिझाइन आधुनिक करणे आवश्यक आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मशिनरी खरेदी करण्याकरिता अतिरिक्त ८६ लाख रुपयांची आवश्यकता असल्याचे सीएमआरसीने सादरीकरणाद्वारे सांगितले. या गुंतवणुकीमुळे उत्पादनाची गुणवत्ता वाढून मागणीत मोठी वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या अतिरिक्त निधीच्या प्रस्तावावर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी चर्चा करून लवकरच मान्यता देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधून चप्पल बनवण्याचा कालावधी, त्यांचे मासिक उत्पन्न आणि नवीन युनिट सुरू झाल्यावर होणारे संभाव्य बदल यावर चर्चा केली. "कोल्हापुरी चप्पल ही आपली पारंपरिक ओळख असून, नवतेजस्विनी प्रकल्पातून या उद्योगाला आधुनिक रूप देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल," असे त्यांनी सांगितले.
या बैठकीत, माविमच्या ‘नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पा’चा आढावा घेण्यात आला. या योजनेचा मुख्य उद्देश बचत गटांद्वारे महिलांचे सक्षमीकरण करणे, त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी संधी उपलब्ध करून देणे, कौशल्य प्रशिक्षण देणे आणि बँक कर्ज मिळवून देण्यास मदत करणे हा आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात माविम अंतर्गत आजपर्यंत २,२९६ महिला बचत गट स्थापन झाले असून, त्यातून ३२,१६० महिलांचे संघटन झाले आहे. विविध बँकांच्या माध्यमातून या बचत गटांना एकूण १८० कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे.