कल्याण \ शंकर जाधव : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी कल्याण - डोंबिवली महानगरपालिका "हरित बाप्पा/फलीत बाप्पा" या संकल्पनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी एका भव्य कार्यशाळेचे आयोजन करत आहे. त्याचबरोबर, "घरोघरी तिरंगा" उपक्रमाचा भाग म्हणून सायकल रॅलीचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
पर्यावरणाची काळजी घेण्याच्या उद्देशाने आणि नागरिकांना शाडू मातीच्या मूर्ती स्थापित करण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरिता, महानगरपालिका एज्युकेशन टुडे फाऊंडेशनच्या सहकार्याने मंगळवार, १२ ऑगस्ट २०२५ रोजी एका मोठ्या कार्यशाळेचे आयोजन करत आहे. ही कार्यशाळा डोंबिवली पूर्वेकडील वै.ह.भ.प संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाच्या कै. सुरेंद्र वाजपेयी सभागृहात दोन सत्रांमध्ये होणार आहे. या कार्यशाळेत महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे ४,००० विद्यार्थी सहभागी होण्याची शक्यता आहे.
कार्यशाळेच्या प्रकल्प प्रमुख तथा कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शाडू माती आणि नैसर्गिक रंगांचा वापर करून पारंपरिक कला आणि निसर्ग संवर्धनाचे महत्त्व समजेल. विद्यार्थी स्वतः श्रीगणेशाची शाडूची मूर्ती बनवणार असून, त्यासाठी लागणारी माती महानगरपालिकेतर्फे पुरवण्यात येणार आहे.
यावेळी महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी गणेश मंडळांना शक्य असल्यास ६ फुटांपेक्षा कमी उंचीच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचे आणि त्यांचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचे आवाहन केले.
"घरोघरी तिरंगा" अंतर्गत सायकल रॅली
शासनाच्या "घरोघरी तिरंगा" उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी रांगोळी काढणे, राखी तयार करणे आणि जवानांना पत्र लिहिणे यासारखे अनेक उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून येत्या रविवारी, १० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ६:३० वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. आयुक्त अभिनव गोयल यांनी अधिकाधिक नागरिकांना "घरोघरी तिरंगा" अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.